स्वयंपूर्ण खेड्यातूनच बनेल आत्मनिर्भर भारत- अविनाश धर्माधिकारी

स्वयंपूर्ण खेड्यातूनच बनेल आत्मनिर्भर भारत- अविनाश धर्माधिकारी

स्वयंपूर्ण खेड्यातूनच बनेल आत्मनिर्भर भारत- अविनाश धर्माधिकारी; सीए दिवसानिमित्त ‘आत्मनिर्भर भारत’वर व्याख्यान

पुणे : “भारताकडे सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. संशोधनाची जोड देऊन त्याचा स्थानिक पातळीवर कुशलतेने वापर केल्यास खेडी स्वयंपूर्ण बनतील. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत ब्रँड मिळवून दिला आणि खेडी स्वयंपूर्ण झाली, तर आगामी काळात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सीए स्थपना दिवसाच्या निमित्त आयोजित ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील व्याख्यानात (लाईव्ह वेबिनार) अविनाश धर्माधिकारी बोलत होते. युट्युबवरून प्रसारित झालेल्या या व्याख्यानावेळी ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, सीए जगदीश धोंगडे, सीए एस. बी. झावरे, सीए यशवंत कासार आदी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “जागतिक स्तरावर भारतीय बाजारपेठ सर्वात मोठी असून, ही आपली ताकद आहे. मागणी-पुरवठा याचा मेळ घालून स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिले, तर आपली अर्थव्यवस्था जलदगतीने सुधारेल. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले आर्थिक पॅकेज या संकल्पनेला बळ देणारे आहे. १३५ कोटीच्या बाजारपेठेत एकाच प्रकारचा जीएसटी आकारला तर स्वातंत्र्योत्तर वाटचालीतील मोठी क्रांती होईल. विदेशी विशेषतः चिनी वस्तू आणि सेवांचा वापर टाळण्यासह अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, लोकसंख्या आणि मागणी यावर अधिक विचार करण्याचा मंत्र मोदी यांनी दिला आहे. ‘ट्रेड फॅसिलिटेशन ऍग्रीमेंट’ झाले तर भारताला जागतिक व्यापारात ३०० बिलियन डॉलर्सचा वाटा मिळेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.”

खासगी क्षेत्राला सर्व सरकारी क्षेत्रे खुली करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. मागणी-पुरवठा यावर आधारित बाजारपेठ चालेल. सरकार केवळ बाजारपेठ व्यवस्थित चालण्यासाठी नियमन करण्याच्या भूमिकेत असेल आणि ही अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची बाब असणार आहे. तेव्हा भारतीय उद्योजकांनी बाजारपेठेची मागणी ओळखून वाटचाल करावी, असेही धर्माधिकारी यांनी नमूद केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविकात सीए दिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. सीए जगदीश धोंगडे यांनी स्वागत-परिचय करून दिला. सीए समीर लड्डा यांनी आभार मानले.

Leave a Reply