सीओईपी अॅल्युमनीच्या अध्यक्षपदी भरत गिते

सीओईपी अॅल्युमनीच्या अध्यक्षपदी भरत गिते

सीओईपी अॅल्युमनीच्या अध्यक्षपदी भरत गिते

सचिवपदी प्रा. सुजीत परदेशी व खजिनदारपदी अंकिता चोरडिया-संचेती

सीओईपी ला ‘ग्लोबल कनेक्ट’ करण्याचा नवीन कार्यकारिणीचा मानस

पुणे, दि. 18 नोव्हेंबर : कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे माजी विद्यार्थी संघटनेची (सीओईपी अॅल्युमनी) नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आली असून अध्यक्षपदी भरत गिते यांची निवड झाली आहे. सचिवपदी प्रा. सुजीत परदेशी व खजिनदारपदी अंकिता चोरडिया-संचेती यांची निवड झाली आहे. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे.

सीओईपी अॅल्युमनीच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत प्रा. सुधीर आगाशे, प्रा. श्रीनिवास महाजन, निशाद द्रविड,अंकिता चोरडिया-संचेती, प्रा. सुजीत परदेशी व भरत गिते विजयी झाले. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गिते म्हणाले की, पुढील तीन वर्षांच्या काळात सीओईपीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल कनेक्ट’ करण्याबरोबरच जगभरातील नामांकित प्रोफेशनल्स व्यक्तींना सीओईपीला कनेक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सीओईपी नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक बी बी अहुजा व इतर वरिष्ठ व मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन पुढील तीन वर्षे विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही योगदान देण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत.

सीओईपी सीएक्सओ क्लब आणि थेट उद्योगाबरोबरील संबंध विकसित करताना सीओईपी मधील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग, सीओईपी स्टार्ट अप्स व शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना भाऊ इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून जोडण्याचा आमचा मनोदय आहे.

सीओईपी हे भारतातील सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने अनेक रथी महारथी या देशाला व विश्वाला दिले आहेत. त्यामुळे सीओईपीचे नाव मोठे आहेच. त्याला आणखी सर्वदूर नेण्यासाठी व ब्रँडिंगसाठी काम करणार आहोत.

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थी विकासाचे विविध प्रकल्प, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्यूटर सायन्स इमारत इत्यादी अनेक विकास कामांसाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. सीओईपीला याकामी आमची अॅल्युमनी आवश्यक त्याठिकाणी सर्वतोपरी सहकार्य करेल.

सीओईपी अॅल्युमनीची आता महिला शाखादेखील सुरू केली जाणार आहे. आणि त्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठीचे प्रकल्प राबविले जाणार आहेत.

आपापल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी सीओईपी अॅल्युमनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या एस बी जोशी ब्रिज अॅवॉर्ड प्रमाणे यावर्षीपासून डॉ. सी. व्ही. कंद यंग ब्रिज अॅवॉर्ड, अभियंता दिवस, अभिमान अभियंता पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सीओईपी अॅल्युमनीचे सदस्य जगभर विविध देशात आहेत. त्यांना अॅल्युमनीला जोडण्यासाठी व अॅल्युमनीच्या कार्याचे त्यांना वेळेवर अपडेट मिळावेत म्हणून व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

माजी विद्यार्थ्यांना पुन्हा महाविद्यालयाशी जोडून आजीवन सदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी काम केले जाणार आहे.

प्राध्यापक व विद्यार्थी या दोघांच्या मदतीने सीओईपीसाठी अधिकाधिक चांगलं ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्व वरिष्ठ व मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही सर्वजण सदैव कार्यरत राहणार आहोत, असेही अध्यक्ष भरत गिते यांनी म्हटले आहे.

Leave a Reply