सांगितिक मैफलीने दिवाळीचा वाढला गोडवा 

सांगितिक मैफलीने दिवाळीचा वाढला गोडवा 

    • सांगितिक मैफलीने दिवाळीचा वाढला गोडवा

ऑनलाईन कार्यक्रम : हेमंत पेंडसे, अपर्णा केळकर, श्रुती देशपांडे, मधुरा कर्वे यांचा सहभाग

पुणे : पहाटेचे अल्हाददायक वातावरण; सुखद वाटणारा गारवा आणि प्रसिद्ध गायक कलाकारांच्या सहभागातून रंगलेला दिवाळी पहाट कार्यक्रम असा योग जुळून आला तो यशवंत प्रतिष्ठान आणि गुरुतत्त्वयोग संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ऑनलाईन सांगितिक मैफलीद्वारे!

मैफलीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात युवा गायिका मधुरा गोवंडे-कर्वे यांच्या गायनाने झाली. सुरुवातीला त्यांनी राग अहिर भैवरमध्ये विलंबित एकतालातील ख्याल ‘ए रसिया म्हारा’ सादर केला. सुरुवात विलंबित नंतर मध्यलयीत बोल-ताना व ताना उत्तम रितीने सादर केल्या. त्यानंतर मध्यलय त्रितालमध्ये ‘अलबेला सजन आयोरे’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. रेखा देशपांडे यांनी अहिर भैरवमध्ये बांधलेला ‘देरेना देरेना’ हा तराना मधुरा यांनी बहारदारपणे पेश केला.

मैफलीच्या पहिल्या दिवसातील दुसरे पुष्प गुंफले ते युवा गायिका श्रुती फडके-देशपांडे यांनी. आपल्या गायनाची सुरुवात त्यांनी राग भटियारने केली. तयारीने सादर केलेल्या या रागानंतर त्यांनी विलंबित एकतालातील पारंपरिक बंदिश ‘बरनी न जाए’ हा ख्याल सादर केला. तसेच द्रुत एकतालात ‘कंथा बिदेसा जो म्हारो’ ही बंदिश सादर केली. या दोन्ही कलाकारांना अथर्व कुलकर्णी (संवादिनी) आणि यश सोमण (तबला) यांनी तितक्याच जोरकसपणे साथसंगत केली.

पंडित हेमंत पेंडसे यांनी ‘मनोरंजनी’ या रागाने दुसर्‍या दिवसाच्या मैफिलीची सुरुवात केली. दुर्गा रागातील कोमल रिषभाने वातावरण अधिकच अल्हाददायक झाले. निखळ आनंद देणार्‍या आवाजाला पं. अभिषेकी ढंगाची वैशिष्ठ्ये दाखवित त्यांनी सुंदर बढत घेतली. ‘नाम तिहारो’ या ख्यालाच्या बंदिशीनंतर ‘आज सखी आनंद भयो है’ ही झपतालातील रचना सादर केली. स्वरचित वैशिष्ठ्यपूर्ण तराणादेखील सादर केला. संत कबिरांची ‘साईने लगन कठीन है भाई’ ही रचना ज्याला पंडित अभिषेकीबुवांनी स्वरसाज चढविलेला आहे याने मैफलीची सांगता केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमात उपेंद्र सहस्त्रबुद्धे (संवादिनी) आणि मिलिंद तायवडे (तबला) यांनी समर्पक साथ केली.

सांगितिक मैफलीचा समारोप अपर्णा केळकर यांच्या गायनाने झाला. सुरुवातीस त्यांनी राग ‘बिलासखानी तोडी’ सादर केला. त्यानंतर विलंबित एकतालात ‘अब मोपे छाए रहो’ ही पंडित सी. आर. व्यास यांची रचना सादर केली. द्रुत तीन तालातील पंडित रामाश्रय झां यांची ‘जगदंबिका’ ही रचना मनाचा ठाव घेऊन गेली. त्यानंतर डॉ. अरविंद थत्ते यांची द्रुत तीन तालातील ‘सरगम’ बहारदारपणे सादर केली. संत तुकाराम महाराज यांच्या ‘लक्ष्मी वल्लभा’ या अभंगाने त्यांनी मैफलीचा समारोप केला. त्यांना सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), कौशिक केळकर (तबला) आणि स्वानंदी केळकर (तानपुरा) यांनी साथ केली.

कलाकरांचे स्वागत गुरुतत्त्वयोग संस्थेच्या विश्वस्त तेजा दिवाण यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना मुक्ता पाध्ये यांची होती.

 

Leave a Reply