डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘डहाळी’ १८ हस्तलिखित दिवाळी अंकांचे प्रकाशन

डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘डहाळी’ १८ हस्तलिखित दिवाळी अंकांचे प्रकाशन

डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘डहाळी’ १८ हस्तलिखित दिवाळी अंकांचे प्रकाशन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या सुलेखनातून साकार झालेल्या ‘डहाळी’ अनियतकालिकांच्या १८ हस्तलिखित दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ ज्योतिर्विद (मॉरिशस) सुजाता केसकर यांच्या हस्ते झाले. महिला ज्योतिर्विद संस्थेतर्फे ऑनलाइन स्वरूपात हे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा ऍड. सुनीता पागे होत्या. प्रसंगी ज्येष्ठ ज्योतिर्विद पं. विजय जकातदार, ‘ग्रहांकित’चे संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, डॉ. जयश्री बेलसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या २२५ विश्वविक्रमाबद्दल ‘वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर्स कौन्सिल हँगकाँग’तर्फे पं. जकातदार यांच्या हस्ते डॉ. घाणेकर यांना ‘मिलेनियम अवॉर्ड फॉर वर्ल्ड रेकॉर्डस’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘डहाळी’ अनियतकालिकासाठी ‘स्मार्ट अस्ट्रॉलॉजर’ संस्थेतर्फे घाणेकर यांना ‘इंटरनॅशनल स्मार्ट अस्ट्रॉलॉजर’ हाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऍड. पागे यांनी प्रास्ताविक केले. सचिव प्रा. स्मिता गिरी यांनी सूत्रसंचालन केले. चित्रा दीक्षित यांनी आभार मानले. रजनी साबदे यांनी ‘डहाळी’च्या १८ हस्तलिखित दिवाळी अंकांचे विश्लेषण केले.

 

डॉ. घाणेकर म्हणाले, “२००६ पासून ‘डहाळी’ अनियतकालिक विनामूल्य चालवत असून, संपादन, संकल्पना, संकलन, सजावट, मांडणी, व्यक्तिचित्र, सुलेखन, काव्य, निर्मिती, वितरण असे ‘सबकुछ मधुसूदन’ या धर्तीवर हे १८ दिवाळी अंक निर्मिले आहेत. त्यात काव्य, अर्कचित्र, काव्यशिल्प, टॉप १० कविता, कुसुमाग्रज टॉप १० कविता, स्टेटस, बाल दिवाळी, अलककथा, एका ओळीच्या कथा, किचन गार्डन, वृद्धाश्रमातील हायकू, हिंदी काव्य, दिव्यांग बालकांचे निबंध अशा विविध संकल्पनांवरील १८ दिवाळी अंक आहेत. लॉकडाऊनमध्ये ‘डहाळी’चे ५० विशेषांक काढले. प्रत्येकाने आपल्या आवडत्या गोष्टीसाठी स्वतःला झोकून देऊन कर्मयोगाचे भान ठेवून सातत्याने झटत राहील्यास हमखास घवघवीत यश मिळू शकते.”

————–

*बहुआयामी डॉ. घाणेकर*

ज्येष्ठ ज्योतिर्विद, लेखक आणि महिला ज्योतिर्विद संस्थेचे संस्थापक, सल्लागार असलेले डॉ. मधुसूदन घाणेकर बहुआयामी आहेत. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे (२०११), तसेच पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे (२०१३) अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या नावावर काव्य, अनुबोधपट, लघुपट, शीळवादन, गायन, ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण, अनियतकालिक, एकपात्री कार्यक्रम आदी क्षेत्रात २२५ विश्वविक्रम भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आदीमध्ये नोंदवले गेले आहेत. जागतिक पातळीवर टॉप १०० मधील विश्वविक्रमवीर म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर्स युनियनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. भारतासह दुबई, नेपाळ, रशिया, न्युझीलँड, हॉंगकॉंग, भूतान, सिंगापूर आदी १७ देशात घाणेकर यांच्या ‘सबकुछ मधुसूदन’ या एकपात्री कार्यक्रमाचे ४५००० हून अधिक प्रयोग झाले आहेत.

Leave a Reply