८० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

८० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

८० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल मध्ये यशस्वी उपचार

पिंपरी – डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील कोविड रुग्णालयामध्ये ८० वर्षीय आजोबांची कोरोनावर मात केली. मोरवाडी, पिंपरी येथील रहिवाशी असलेल्या आजोबांना दि. ६ जुलै रोजी डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या आजोबांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांची शरीरातील ऑक्सीजन पातळी कमी असल्याने ऑक्सीजन लावण्यात आले, त्यांच्या तपासण्या केल्या असता त्यांना निमोनिया असल्याचे आढळून आले व त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास आहे. या परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करणे फारच जोखमीचे होते. त्वरित त्यांच्यावर अतिदक्षता विभागात जीवन रक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) वर उपचार सुरु केले असता सात दिवसात त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असल्याचे दिसून आले. या उपचारांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना मुक्त झाले आहेत अशी माहिती श्वसन विकार विभागाचे प्रमुख व कोविड रुग्णालयाचे मुख्य समन्वयक ब्रिगेडियर डॉ. एम. एस. बरथवाल यांनी दिली. ते पुढे म्हणाले या संपूर्ण प्रक्रियेत आय सी यु चे तज्ञ् डॉक्टर्स, निवासी डॉक्टर्स, भूल तज्ञ्, यांचे मोलाचे योगदान होते. अशा या तज्ज्ञांच्या साहाय्याने या रुग्णाला योग्यरितेने व गरजेनुसार आवश्यक औषधे व तपासण्या वेळेत केल्यामुळे वृद्ध आजोबांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले. आम्हाला आनंद आहे की सात दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर ते आज व्हेंटिलेटर वरून बाहेर येऊ शकले. आता त्यांना वार्ड मध्ये दाखल केले असून त्यांना दोन दिवसांनी घरी सॊडण्यात येईल. या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयीन व्यवस्थापनाचे डॉ. बरथवाल यांनी आभार मानले. रुग्णालयात जागतिक दर्जाची अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे हे शक्य झाले असे त्यांनी नमूद केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी या ८० वर्षीय वृद्धावर केलेल्या यशस्वी उपचाराबद्दल यात सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply