सीए विद्यार्थ्यांसाठीच्या ‘ऍस्पायर टू इन्सपायर’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

सीए विद्यार्थ्यांसाठीच्या ‘ऍस्पायर टू इन्सपायर’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

आर्थिक स्थिती सुधारण्यात सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन.

पुणे : “सैन्यदलातील सैनिक जसे देशाच्या सीमांचे रक्षण करतात. तसेच सनदी लेखापाल देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित राहील, यासाठी प्रयत्नशील असतात. एकप्रकारे ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे सैनिकच आहेत. त्यामुळे सनदी लेखापालांनी सैनिकांमधील स्वयंशिस्त, समर्पण, प्रामाणिकता आदी गोष्टी आत्मसात कराव्यात,” असे प्रतिपादन भारतीय नौदलातील व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, स्टुडंट स्किल्स एनरीचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे ‘विकासा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीए विद्यार्थ्यांसाठीच्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी सुनील भोकरे बोलत होते. प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रज्योत सिंह नंदा, एशियन ओशियन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपचे (एओएसएसजी) चेअरमन सीए डॉ. एस. बी. झावरे, पुणे ‘आयसीएआय’चे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, गायिका मधुरा दातार, ‘विकासा’चे उपाध्यक्ष मन्मथ शेवाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रावर कोरोनाचा झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी सीए विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवालाचे प्रकाशन डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झाले. हा अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर केला.

सुनील भोकरे म्हणाले, “सनदी लेखापालांनी देशातील करदात्यांना कर भरण्याचे महत्व पटवून द्यावे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम आपण करत असता. देशासाठी सशस्त्र सैनिक जितके महत्वाचे, तितकेच तुम्ही आर्थिक सैनिकही महत्वाचे आहात. आपण प्रत्येकाने देशभावना जागृत ठेवून काम केले पाहिजे.”

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “प्रत्येकाला आकर्षित करणारा सीएचा हा अभ्यासक्रम आहे. मलाही कधीकधी सीए व्हायला हवे होते, अशी खंत वाटते. आम्ही डॉक्टर माणसांना बरे करतो, तर तुम्ही सनदी लेखापाल अर्थव्यवस्थेला बरे करत असता. या कोरोनाच्या काळाने आपल्याला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर पाडण्यात सनदी लेखापालांचे योगदान महत्वाचे राहणार आहे.”

सीए चंद्रज्योत सिंह नंदा म्हणाले, “विद्यार्थ्यानी आपली आवड ओळखून त्यामध्ये सातत्याने काम करत राहावे. कामात निष्ठा, राष्ट्रप्रेम आणि समर्पणाची भावना असावी. अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्राभिमान जागृत ठेवणारे भगतसिंग आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. दृष्टिकोन, कार्यक्षमता आणि जिद्द या गोष्टीचा अंगीकार केला, तर जीवनात यशस्वी होता येते.”

डॉ. एस. बी. झावरे म्हणाले, “परिषदेत नाविन्यपूर्ण विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने मदत होईल. प्रत्येकाने ‘परफेक्ट’चा कानमंत्र जपावा. त्यामध्ये व्यावसायिकता, परिणामकारता, नियमितता, दृढता, स्व:मूल्यांकन, आचरण, सजगपणा अंगीकारावा.”

या तीन दिवसांच्या परिषदेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडेल, असे सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए यशवंत कासार यांनीही मार्गदर्शन केले. मधुरा दातार यांनी स्वागत गीताने सर्वांची मने जिंकली. सीए समीर लड्डा यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सायली चंडेलिया यांनी सूत्रसंचालन केले. सीए काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले.

Leave a Reply