‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टला हरिद्वार कुंभमेळयात ‘शाही स्नान  करीता’ विशेष निमंत्रण.

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टला हरिद्वार कुंभमेळयात ‘शाही स्नान  करीता’ विशेष निमंत्रण.

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टला हरिद्वार कुंभमेळयात ‘शाही स्नान  करीता’ विशेष निमंत्रण.

मुख्य निमंत्रक श्री शंभू पंचअग्नी आखाडा दक्षिण भारत प्रमुख प.पू. श्री. १०८ महंत लोकेश चैतन्य महाराज यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांना दिले निमंत्रण

पुणे : हिंदू धर्माचे कुंभपर्व हे महत्वाचे पर्व आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे. यावर्षी हरिद्वार येथे ११ वर्षांनी कुंभमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये चार शाही स्नान होणार आहेत. याकरीता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांना मेळयाचे व शाही स्नान करीता मुख्य निमंत्रक श्री शंभू पंचअग्नी आखाडयाचे दक्षिण भारत प्रमुख प.पू.श्री.१०८ महंत लोकेश चैतन्य महाराज यांनी निमंत्रण दिले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, कुंभमेळ्याचे दक्षिण भारत समन्वयक विठ्ठल कदम  आदी उपस्थित होते. आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या १३ आखाडयांपैकी श्री शंभू पंचअग्नी आखाडा हा प्रमुख आखाडा आहे. श्री गणेश ही प्रथम देवता आहे. त्या श्रीगणेशाच्या देवस्थानांचे प्रतिनिधीत्व करणा-या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि महाराष्ट्रातील अष्टविनायक यांना कुंभमेळ्यास यंदा विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

अष्टविनायक देवस्थानांना निमंत्रित करण्याची जबाबदारी दगडूशेठ गणपती ट्रस्टकडे देण्यात आली आहे. श्री शंभू पंचअग्नी आखाडा यांच्यातर्फे दिनांक ११ मार्च, १२ एप्रिल, १४ एप्रिल आणि २७ एप्रिल २०२१ रोजी हरिद्वार येथे शाही स्नान आयोजित केले आहे. त्या शाही स्नानामध्ये  दगडूशेठ गणपती आणि अष्टविनायक गणपती देवस्थानांच्या विश्वस्तांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

प.पू.श्री.१०८ महंत लोकेश चैतन्य महाराज म्हणाले, कुंभमेळ्यामध्ये कोटयवधी भाविक स्नान करण्याकरीता येतात. प्रयाग, नाशिक आणि हरिद्वार येथे मेळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठी धर्मध्वज पूजन, कथा, प्रवचन आणि देशभरातून येणा-या संत महंतांसाठी संत संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम योगदान असल्याने यंदा कुंभमेळ्याकरीता निमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.

फोटो ओळ : हरिद्वार येथे होणा-या कुंभमेळ्यात शाही स्नान करीता  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांना मुख्य निमंत्रक श्री शंभू पंचअग्नी आखाडयाचे दक्षिण भारत प्रमुख प.पू.श्री.१०८ महंत लोकेश चैतन्य महाराज यांनी निमंत्रण दिले. यावेळी उपस्थित मान्यवर व विश्वस्त.

Leave a Reply