पाटील, हर्डीकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान

पाटील, हर्डीकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान

ज्ञाननिष्ठा, शिक्षकांची प्रतिष्ठा जपणारी शिक्षण व्यवस्था हवी- डॉ. रामचंद्र देखणे यांचे मत

पाटील, हर्डीकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान

पुणे : “महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून त्यांना कृतीत उतरवण्याची गरज आहे. बंधुतेचा विचार व्यासपीठावर मांडण्यापुरता मर्यादित नसून, तो आत्मसात करायला हवा. शिक्षक हा सर्वात श्रीमंत माणूस असून, ज्ञानदानातून विद्यार्थी घडविण्याचे मोठे काम ते करत असतात. त्यांना प्रतिष्ठा देणारी आणि ज्ञानाशी निष्ठा ठेवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हायला हवी,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.

साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महाराष्ट्र विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. देखणे बोलत होते. चिखली येथील कॉनक्वेस्ट महाविद्यालयात उभारलेल्या साने गुरुजी साहित्यनगरीत झालेल्या या संमेलनात ज्येष्ठ जलतज्ज्ञ इंजि. अनिल पाटील व ज्येष्ठ अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. मदन हर्डीकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष प्राचार्य प्रा. प्रदीप कदम, कवी चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रकाश जवळकर, संयोजक महेंद्र भारती, प्रा. वैभव पताळे, प्रा. प्रशांत रोकडे, शंकर आथरे आदी उपस्थित होते. प्रसंगी गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. राजेंद्र कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. देखणे म्हणाले, “शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते अद्वैत स्वरूपाचे असते. समाजातील अंधकार दूर करण्याचे काम शिक्षक करतात. मात्र, दुर्दैवाने आज संवाद हरवत चालला आहे. आजी-आजोबांचे संस्कार होत नाहीत. सर्वत्र विसंगतीचे वातावरण असताना शिक्षकांनी ही जाणीव पेरायला हवी. त्यासाठी बंधुता परिवार करत असलेले कार्य मोलाचे आहे. मूल्यांची निष्ठा अखंडपणे जपण्याचे काम बंधुता परिवाराने केली. कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडले. माणूस कुठे असावा आणि कुठे स्थिरावला पाहिजे, हेही यातून समजले. कोरोना काळात आलेल्या जाणीवा, अनुभूती आणि संवेदना जपाव्यात. यातून मोठी साहित्य निर्मिती होईल.”

अनिल पाटील म्हणाले, “पाण्याची उपलब्धता आणि त्याचे वाटप याचा ताळमेळ ठेवणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढतेय, मात्र जलस्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. २०५० नंतर अन्नधान्य, पाणी अशा नव्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईची भीती आहे. पाणीप्रश्न राष्ट्रीय मुद्दा झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. तळी बुजवत असल्याने आज केवळ पाच लाख तळी आपल्या देशात आहेत.”

डॉ. मदन हर्डीकर म्हणाले, “समाजातील जातीभेद निर्मूलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. त्यांच्या विचारांचे प्रामाणिक अनुकरण केले, तर समाजात बंधुतेचा विचार रुजेल. प्रत्येकाने संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची गरज आहे.”

प्रकाश रोकडे यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रोकडे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. आभार प्रा. अमोल कवडे यांनी मानले.

Leave a Reply