मुलांच्या ई-बुक चे प्रकाशन
पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकारातून मनपाच्या घरटं प्रकल्पातील मुलांनी केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती रूबल अग्रवाल यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर उपस्थित होत्या. रेणूताईंनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.”मनपाच्या एखाद्या प्रकल्पात असं सृजनशील काम होत असल्याचे कौतुक वाटल्याने त्याचे ई-बुक करावे असे वाटले. त्याला सर्वांची साथ मिळाल्यामुळे आज गुपी गाईन, बागा बाईन* चे प्रकाशन होत आहे. त्याबद्दल आनंद व्यक्त करते.” असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती रूबल अग्रवाल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “आपण आयुष्यभर सतत शिकत राहिले पाहिजे ” असे त्या म्हणाल्या. “कोणतेही समाजोपयोगी काम असेल तर ते सगळ्यांच्या सहकार्याने सतत पुढे नेले पाहिजे” असेही त्यांनी सांगितले. “खेळ खेळणं आणि गोष्टी ऐकायला मिळतं हा मुलांचा हक्क आहे. आणि तो त्यांना मिळेल असं पाहणं हे आपणा जबाबदार प्रौढांचं कर्तव्य आहे. समाजातली सगळी मुलं आनंदी राहिली पाहिजेत.” असे प्रतिपादन रेणूताई गावस्कर यांनी केले.
लॉकडाऊनच्या काळात एक थेरपी म्हणून रेणूताईंनी मुलांसाठी कथाकथनाचा उपयोग केला. त्या गोष्टींपैकी मुलांना भावलेल्या एका गोष्टीवर त्यांनी हस्तलिखित पुस्तक बनविले. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी माधुरी सहस्रबुद्धे यांनी या ई-बुक ची निर्मिती केली.या उपक्रमाला महिला व बालकल्याण समितीतील सर्व सहकाऱ्यांची साथ लाभली असे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी नमूद केले. ज्या मुलांनी पुस्तकाच्या निर्मितीत भाग घेतला त्यांना नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याकडून गोष्टींच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
यावेळी महिला बालकल्याण समिती उपाध्यक्षा वृषाली चौधरी, समिती सदस्या श्वेता गलांडे- खोसे तसेच अनिता कदम समाजकल्याण उपायुक्त रंजना गगे,श्री. रामदास चव्हाण, राहुल म्हस्के, अजय उमांडे, घरटं प्रकल्पाच्या संचालिका इंद्रायणी गावस्कर व सहकारी तसेच पुस्तक निर्मितीत सहभागी असलेले लहान मुले प्रकाशनाला उपस्थित होते.