‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी समीर लड्डा- उपाध्यक्षपदी काशिनाथ पठारे यांची निवड
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए समीर लड्डा, तर उपाध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे यांची निवड झाली. २०२१-२०२२ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए समीर लड्ढा यांनी मावळते अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए ऋता चितळे उपस्थित होते.
सीए अभिषेक धामणे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लड्डा व पठारे यांचे अभिनंदन केले. आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे १०,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.
सीए समीर लड्डा म्हणाले, “मागील तीन वर्षांमध्ये पुणे शाखेला मेगा श्रेणीमध्ये १२ पारितोषिके मिळाली. पारितोषिक मिळवणे हा उद्देश नसून, पुणे शाखेच्या उत्तम कामाचे ते प्रतीक आहे. या शाखेचे काम असेच पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील. मागील वर्षी पुणे शाखेने ‘३आय’ इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा), इमेज (प्रतिमा), इंन्टलेक्च्युअल (बौद्धिकता) यावर काम केले. या वर्षी ‘इ-स्क्वेअर म्हणजे एथिक्स (तत्व), एक्सपान्शन (विस्तार), ई-गव्हर्नन्स (तांत्रिकीकरण), एक्सपर्टाइज (कुशलता) या संकल्पनेवर काम करेल. भारतातील सर्वात मोठ्या शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने दिल्याबद्दल सर्व सनदी लेखापाल सदस्यांचा आभारी आहे.”