मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आपटे प्रशालेतील ५९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची मदत

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आपटे प्रशालेतील ५९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची मदत

‘मुकुल माधव’च्या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल-ऍड. अभय आपटे

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आपटे प्रशालेतील ५९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची मदत

पुणे : “कोरोनामुळे अनेक पालकांसमोर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा प्रश्न होता. मात्र, मुकुल माधव फाउंडेशनने त्यांचे शुल्क भरल्याने त्यांना आधार मिळाला आहे. आता ते शिक्षणावर लक्ष केंद्रित करतील व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल,” अशी भावना विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष ऍड. अभय आपटे यांनी व्यक्त केली.

मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने गरीब व वंचित घटकांतील ५९ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरून सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या स्वरूपात अभिवादन करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने विद्या महामंडळ संस्थेच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अ. ल. देशमुख, आपटे प्रशालेच्या प्राचार्या मेधा सिन्नरकर, मुकुल माधव फाऊंडेशनचे प्रतिनिधी बबलु मोकळे, यास्मिन शेख, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे नीरज बरेठिया आदी उपस्थित होते.

ऍड. अभय आपटे म्हणाले, “फाउंडेशनने केलेल्या मदतीमुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. चांगल्या गुणांसह हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतील. शहरी व ग्रामीण भागात जाऊन फाउंडेशन करत असलेले काम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी या मदतीचे मोल लक्षात घेऊन मनापासून शिक्षण घ्यावे व पुढे जाऊन गरजूंसाठी आशा प्रकारे मदतकार्य करावे. ‘ज्योत से ज्योत मिलते चलो’ या उक्तीप्रमाणे मदतीचा वसा पुढे न्यावा.”

डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, “समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर समाजातील काही घटकांनी अशाप्रकारे मदत करावी. ‘मुकुल माधव’च्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना मदतीचा हात मिळत आहे.” वंचित, गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देऊन त्यांना चांगले शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याचा फाउंडेशनचा उद्देश असल्याचे बबलू मोकळे यांनी सांगितले.

विद्यार्थी शिवम शिंदे म्हणाला, “माझे बाबा रिक्षाचालक आहेत. लॉकडाऊन काळात रिक्षा चालवण्याचे काम बंद असल्याने फी भरायला अडचण येत होती. शाळा आणि फाऊंडेशनच्या मदतीमुळे फी भरायला आधार मिळाला.” तर “आम्हाला शाळेची फी भारण्यासाठी मदत केल्याबद्दल फाउंडेशनचे आभार मानते व खुप अभ्यास करून त्यांनी केलेली मदत सार्थकी लावेल,” असा विश्वास प्राची साळवे या विद्यार्थिनीने व्यक्त केला.

मेधा सिन्नरकर यांनी प्रास्ताविक केले. सुमेधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave a Reply