देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय जमा

देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय जमा

देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय जमा

पुणे दि. २८ : कोवीड १९ चा प्रादुर्भाव कालावधी वाढत असल्याने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीतांना तसेच वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना कोविड-19 लॉकडाउनमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हयातील बँक खाते उपलब्ध असलेल्या 5 हजार 296 संबधित महिलांच्या बँक खातेमध्ये रु. ७ कोटी ९४ लाख ४० हजार इतकी रक्कम दोन टप्प्यात वितरीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी वेश्या व्यवसायावर अवलंबुन असणा-या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिकसहाय्य या सारख्या मुलभुत सेवा कोणत्याही ओळखपत्राची विचारणा न करता पुरविण्याबाबत आदेश पारीत केलेले आहेत. त्याअनुषंगाने देह विक्री करणा-या महिलांना उपरोक्त आदेशा प्रमाणेसहाय्य करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांचा समावेश आहे. पुणे जिल्हयातील वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना अर्थसहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात आल्या.

गरजू महिलांना त्वरीत अर्थसहाय्य मिळावे यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.श्रीमती अश्विनी कांबळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी रेड लाईट एरीया मध्ये जाऊन तेथे काम करणा-या संस्थांसोबत बैठक घेतली. संबधित महिलांची माहितीसाठी जिल्हा एड्रस प्रतिबंध व नियंत्रण मंडळ पुणे यांचेकडे वेळोवेळी संपर्क साधण्यात आला. जिल्हा एड्रस प्रतिबंध व नियंत्रण मंडळ पुणे यांनी संबधित महिलांची बँक खातेची माहिती उपलब्ध करुन दिल्यावर लेखा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील अधिकारी / कर्मचारी यांनी संबधित महिलांची बँक खातेची पडताळणी करुन अचुक बँक खाते राहतील याची दक्षता घेतली.

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीतांना तसेच वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना प्रतीमहा रु. पाच हजार तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरीक्त रु. २ हजार ५०० इतके आर्थिक सहाय्य थेट लाभ हस्तांतर पध्दतीद्वारे कोणत्याही ओळखपत्राची विचारणा न करता माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2020 कालावधीसाठी अदा करण्यासाठी पुणे जिल्हयासाठी रु. ११ कोटी २६ लाख ६५ हजार इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधुन जिल्हाधिकारी, पुणे यांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाला आहे.

पहिल्या टप्प्यात माहे फेब्रुवारी मध्ये जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग पुणे यांचेकडुन ७ हजार ११ वेश्या व्यवसाय करणा-या महिलांपैकी १ हजार ७६५ वेश्या व्यवसाय करणा-या महिलांचे बँक खात्याचा तपशिलाप्रमाणे प्रती महिना रु. ५ हजार प्रमाणे ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्याचे रु. १५ हजार प्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये उपलब्ध असलेल्या निधी मधुन एकुण रु. २ कोटी ६४ लाख ७५ हजार अर्थसहाय्य म्हणुन थेट लाभ हस्तांरण पध्दतीद्वारे वितरीत करण्यात आले आहेत.

दुस-या टप्प्यात जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग पुणे यांचेकडुन ३ हजार ५३१ वेश्या व्यवसाय करणा-या महिलांच्या बँकखातेचा प्राप्त तपशिल प्रमाणे प्रती महिना रु. ५ हजार प्रमाणे ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्याचे रु. १५ हजार प्रमाणे जिल्हयासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये उपलब्ध असलेल्या निधी मधुन एकुण रु. ५ कोटी २९ लाख ६५ हजार अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले.

सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, श्री. प्रसाद सोनवणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग पुणे, रेड लाईट एरीया मध्ये काम करणा-या संस्था व लेखा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील अधिकारी / कर्मचारी यांनी महत्वाचे योगदान दिले असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply