सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ कार्यक्रम

सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ कार्यक्रम

ध्येयपूर्तीसाठी सकारात्मक विचार उर्जादायी -श्यामराज ई. व्ही.

पुणे : “प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठे स्वप्न असते. त्या स्वप्नपूर्तीसाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम घेण्याची तयारी असावी लागते. जीवनात असंख्य अडचणी, अपयश येत राहील. मात्र, आपल्यातील सकारात्मक विचार आपल्या ध्येयपूर्तीसाठी उर्जादायी ठरतात,” असे प्रतिपादन निवृत्त कमांडो श्यामराज ई. व्ही. यांनी व्यक्त केले.

सुरेंद्र पठारे फाउंडेशन आणि युथ फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ कार्यक्रमात श्यामराज बोलत होते. प्रसंगी माजी आमदार बापूसाहेब पठारे, व्हिक्टोरिअस स्कुलचे संस्थापक अध्यक्ष व निवृत्त विंग कमांडर रॉबिन घोष, फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे, मेजर शिवप्रिया श्यामराज, नगरसेवक भैयासाहेब जाधव, युथ फाउंडेशनचे रोहन शेट्टी आदी उपस्थित होते.

श्यामराज म्हणाले, “कोरोनामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे आली, तरी त्यामुळे हार मानून चालणार नाही. प्रत्येक संकट नव्या संधी घेऊन येत असते. त्यात एक प्रेरणा मिळाली की उत्साह वाढतो. नैराश्याने अथवा नकारात्मक विचारांनी मरगळ येते. अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने उभा राहीले पाहिजे.”

“मी ‘ऑपरेशन पराक्रम’च्या हल्ल्यात जखमी झालो. सोबतच्या सहकाऱ्यापैकी ९ जण शहीद झाले. ते मला सहा महिन्यांनी समजले. कारण काहीकाळ मी कोमामध्ये गेलो होतो. तीन वर्षानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हात-पाय सुरक्षित राहिले. मात्र पायांवर उभे राहता येत नाही. कधी तरी उभे राहून चालेल, या आशेवर जीवन जगत आहे. आई-वडिलांसाठी जिवंत राहिलो, हे नशीब समजून देवाचे आभार मानत असतो. मात्र हार कधी मानली नाही. लढत राहिले तर यश नक्कीच मिळते,” अशा शब्दांत श्यामराज यांनी आठवणींना उजाळा दिला.

रॉबिन घोष म्हणाले, “एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल, असे भाकीत स्वामी विवेकानंद यांनी केले होते. हे स्वप्न साकारण्यासाठी युवापिढीचा सहयोग महत्वाचा आहे. सत्यता, प्रामाणिकता, सेवाभावी वृत्तीने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे. युवाशक्ती भारताला एका नव्या यशशिखरावर घेऊन जाईल. बापूसाहेब पठारे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन स्नेहा करमरकर आणि निखिल लिमये यांनी केले. आभार रोहन शेट्टी यांनी मानले.

तरुणांसाठी फाउंडेशनचा पुढाकार
तरुणांना घडविण्यासाठी फाउंडेशन काम करणार आहे. रोजगार मेळावा, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर, रक्तदान अभियान, युवतींना रोजगार प्रशिक्षण आदी उपक्रम घेतले जाणार आहेत. राजकारणाला मर्यादा असतात, मात्र समाजकारणाला कोणतीही मर्यादा नसते. म्हणूनच समजातील तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ या उपक्रमाचे अयोजन आले.

Leave a Reply